अफगाणिस्तान भारत संबंध: एक दृष्टिक्षेपमौर्य सम्राट अशोकचा कंदहार शिलालेख. सदर शिलालेख द्वैभाषिक असून ग्रीक व अरमाईक भाषांमध्ये कोरल्या गेला होता


अफगाणिस्तान भारत संबंध: एक दृष्टिक्षेप


अफगाणिस्तान मध्ये पुन्हा एकदा तालिबानने स्वतः चे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जवळपास वीस वर्षांपूर्वी झालेल्या "९/११" दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिका व त्याच्या मित्र देशांच्या आघाडीने केलेल्या सैन्य कारवाई मुळे तालिबानी राजवट अचानक कोसळली होती. जसे तालिबानचे कोसळणे झपाट्याने झाले होते तशीच सध्याचे अफगाणी राज्य गंजी पत्त्यांसारखे कोसळले आहे. एकूणच सशक्त राज्य व्यवस्था निर्माण करण्यात अफगाणी समाज सातत्याने अपयशी ठरला आहे. जमाती - बिरादरीच्या निष्ठा व पश्तूनवली सारखे पारंपरिक कायद्यांपुढे राजसी सर्वंकष सत्ता (Royal Absolutism) अथवा आधुनिक राष्ट्रवाद यासारखे विचार अद्यापही टिकू शकले नाहीत. इस्लाम हाच एकमेव दुवा आहे जो विविध जमाती व राष्ट्रीय स्वरूपाच्या घटकांना जोडतो. त्यामुळे इस्लामवर निष्ठा दाखवणारे विविध गट सत्तास्थानी आले आहेत. त्यात अधिकाधिक प्रखर निष्ठा दाखवण्याची चढाओढ राहिली आहे आणि त्यातच तालिबान सारख्या कट्टरपंथी गटाची सरशी झाली आहे. अर्थातच हे शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय अशक्य होते. मात्र, यात सर्वसामान्य अफगाणी नागरिक भरडल्या जाणार व अधिकाधिक प्रमाणात बाहेरील प्रगत होत जाणाऱ्या जगापासून तुटणार असे वाटते.
भारत-अफगानिस्तान संबंधांच्या संदर्भात बोलायचे तर आजच्या घडीला अफगाणिस्तान मध्ये भारतासाठी परिस्थिती मोठीच बिकट झाली आहे. मागच्या दोन दशकांत अफगाणिस्तानवर केलेला सर्व खर्च वाया गेलेला आहे की काय असे वाटणे स्वाभाविक आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध अगदी प्राचीन काळापासून चालत आले आहेत. मौर्य काळात, इ. स. चौथ्या शतकात, मौर्य-ग्रीक यांच्यातील युद्धानंतर, पहिल्यांदा भारताचा राजकीय प्रभाव अफगाणिस्तानत निर्माण झाला. मौऱ्यांनी पूर्व आणि दक्षिण अफगाण व आजचा पश्चिम पाकिस्तान ताब्यात घेतला होता. भारताच्या राजकीय सीमा सिंधू नदीवरून (ज्यावरून भारतीयांना ग्रीकांनी इंडियन व पर्शियन लोकांनी हिंदू मानले) हिंदुकुश पर्वतांपर्यंत गेल्या. अशोकच्या शिलालेखांवरून हे स्पष्टच आहे. त्यानंतर मध्य आशियातून आलेल्या कुशानांनी उत्तर भारताला त्यांच्या बहुसांस्कृतिक साम्राज्यात समाविष्ट केले. नव्हे, तर कुशानांचेच भारतीयकरण झाले. त्यानंतर मात्र हा भूप्रदेश भारताच्या राजकीय प्रभावापलीकडे गेला. महायान बौद्ध धर्मामुळे सांस्कृतिक धार्मिक प्रभाव मात्र कायम राहिला जो आपल्याला गांधार कला शैली मध्ये दिसून येतो. अफगाणिस्तान मध्ये इस्लामच्या आगमनानंतर तो सांस्कृतिक प्रभाव सुद्धा संपुष्टात आला.

अफगाणिस्तान हा सातत्याने भारतावर हल्ला करण्यासाठी staging ground बनला. भारतातील समृद्ध समाज हा मध्य आशियातील भटक्या जमातींसाठी आकर्षक लक्ष्य राहिला. गझनी व घोरी या तुर्की शासकांनी अफगाणिस्तानातूनच भारतावर हल्ले केले. मात्र, भारतीय शासकांकडून या समस्येवर दूरदृष्टीने कोणतेही सामरिक उपाय करण्यात आले नाही. खैबर, बोलन, गोमल अश्या समारिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण खिंडींचे रक्षण करणे आवश्यक आहे असे कुणालाही वाटले नाही. अर्थात भारतीय राजे स्वहित जाणत नव्हते असे नाही, किंवा भारताला सशक्त राजकीय व लष्करी परंपरा नव्हत्या असेही नाही. मुळातच भारतीय राजकीय समुदायात, राज्य-निर्मितीच्या प्रक्रियेत म्हणावी तशी strategic (सामरीक) मानसिकताच कधी निर्माण झाली नाही. मुईझुद्दिन बिन सम (घोरी) याने खैबर वाटे पंजाब वर आक्रमण केले (११९१) तेव्हा चहमाण पृथ्वीराज तृतीय याने तत्काळ हल्ला करून त्याला परतवून लावले. मात्र, पुढच्या वर्षी तो परत आला आणि भारतात तुर्की सत्तेची स्थापना झाली.

भारतात तुर्की सत्तेच्या स्थापनेनंतर मात्र ही परिस्थिती बदलली. दिल्लीच्या सुलतानांनी सीमावर्ती भागांच्या रक्षणाला पराकोटीचे महत्त्व दिले. यासंदर्भात १३ व्या शतकापासून जगज्जेते मंगोल टोळीवाले हे सर्वात मोठ्या संकटाच्या रूपात उभे राहिले होते. त्यांच्या सततच्या त्रासामुळे मामलुक सुलतान इलतूत्मिश व बलबन यांच्या पर्यंतचे सत्ताधीश राज्य विस्तार करू शकले नाही. त्यांचे लक्ष केवळ वायव्य सरहद्दच्याच रक्षणाकडे राहिले. शमसुद्दिन इलतुत्मिशने तर ख्वरिझम चा राजपुत्र जलालुद्दिन मंगबरनी याने प्रस्तावित केलेल्या मंगोल विरोधी मुस्लिम आघाडी मध्ये सहभागी होण्यास पूर्णपणे नकार दिला होता. जलालुद्दिन सोबत गैरमुस्लिम असलेल्या चेंगिझ खान विरुद्ध युती करून सुलतानाला मंगोलांचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता. गियासुद्दिन बलबनने तर मंगोल राजदुतांसमोर स्वागतासाठी स्वतः चे संपूर्ण सैन्य तर उभे केलेच पण शाही पाकखान्यातील आचाऱ्यांना सुद्धा सैनिकी वेशात उभे केले होते. यामागचे कारण अर्थातच मंगोल राजदूतासमोर शक्ती प्रदर्शन करणे हेच होते.

मात्र, खिलजी क्रांतीनंतर हे सर्व बदलले. हा दिल्ली सल्तनतचा शक्तीचा सर्वोच्च काळ होता. बलबन ने केलेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर अलाउद्दीन खिलजी सारखा अतिशय धोरणी व पक्क्या निर्धाराचा सुलतान सत्तेत आला होता. उल्लेखनीय म्हणजे त्याच्याच काळात मंगोल आक्रमणांनी परिसीमा गाठली होती. मात्र, अलाउद्दीनने आतापर्यंतच्या बचावात्मक मानसिकतेचा त्याग करून आक्रमक धोरण आखले. अलाउद्दीन ने पाच मोठ्या आक्रमणांना पराभूत तर केलेच पण अफगाणिस्तान वर भारतीय प्रभाव निर्माण केला. त्याच्या मृत्यूनंतर खिलजी प्रभाव झपाट्याने कमी झाला व त्याचा परिणाम म्हणजे तिमुर लंग चे अत्यंत भयंकर व उग्र आक्रमण होण्यात झाला. दिल्लीला पुन्हा एकदा सावरायला अनेक दशके लागली.

त्यानंतर, सोळाव्या शतकात मध्य आशियातून आलेल्या व सशक्त राजकीय परंपरा व विचार असलेले मुघल सत्तेत आले. अकबर महान याने अथकपणे जवळपास १३ वर्षे मोहीम राबवून काश्मीर, बाल्टीस्तान, काबुल (१५८१) आणि कंदहार (१५९६) जिंकून घेतले व पुन्हा एकदा वायव्य सरहद्दीच्या पलीकडे हिंदुकुश पर्वतांपर्यंत भारतीय प्रभाव निर्माण केला. अनेक महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली राजपूत योद्धे या मुघल सैन्याचा भाग होते. राजा मान सिंह हा काबुलचा सुभेदार होता. त्याने अनेक युद्धामध्ये विजय मिळवला. राजा तोडर मल, राजा भगवान दास, राजा बिरबल यांनी बल्ख, गझनी, जलालाबाद सारख्या ठिकाणी शौर्य गाजवले. अश्याच एका मोहिमेत बिरबल (महेश दास) याचा मृत्यू झाला. पूर्व अफगाणिस्तानात असलेले दुर्राणी शासकांनी राजधानी असलेले कंदहार हे शहर तर इराणी (साफावी) आणि हिंदी (मुघल) यांच्यातील सत्तासंघर्षाच केंद्रबिंदूच होते कारण दोघांनाही मध्य आशियातील टोळ्यांची भीती होती व व्यापारी मार्गांच्या दृष्टीने देखील कंदहार महत्त्वपूर्ण होते.

वासाहतिक काळात ब्रिटिश आणि रशियन साम्राज्यांनी मध्य आशियावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तान मध्ये स्वतः ला फायदेशीर असणारे, पण विशेष लोकप्रिय नसणारे शासनकर्ते बसवायला सुरुवात केली होती. वसाहतोत्तर काळात त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. मात्र, यावेळी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी व विशेषतः पाकिस्तानी सैन्याने भारताविरुद्ध "Strategic Depth" मिळण्यासाठी अफगाणिस्तानवर धर्माच्या आधारे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

अफगाणिस्तानवर परकियांनी सत्ता चालत नाही असा प्रवाद आहे. मात्र, परकियांपेक्षा अफगाणी लोकांना, विशेषतः पश्तुन लोकांना, राजकीय सत्ता चालत नाही असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. सशक्त राजकीय परंपरा नसल्यामुळे सध्यातरी हीच theocratic (धर्माधिष्ठित) राज्य व्यवस्था राहील असे दिसते. संपूर्ण जगाने मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेता अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडू नये. अफगाणी जनतेसाठी आणि जागतिक शांततेसाठी अफगाणिस्तान सोबत सातत्याने engaged राहावे. मागच्या वेळी तालिबानी सत्तेला केवळ पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया याच देशांनी मान्यता दिली होती. त्यामुळे अफगाणिस्तान साठी पाकिस्तानवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर अफगाण समाजात भारताबद्दल असलेला सौहार्द महत्त्वाचा आहे. तो वृद्धिंगत करून अफगाणिस्तानातील भारताचा रचनात्मक प्रभाव कायम राहू शकतो. आपण फाळणी व त्यानंतरच्या युद्धामुळे दुरंड रेषेपासून दुरावलो असलो तरी भारत अफगाणिस्तान संबंध हे दक्षिण आशियातील शांततेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आपण अफगाणिस्तानच्या नव्या शासकांसोबत चर्चेचे आणि संदेशनाचे मार्ग सुरू ठेवले पाहिजे.

- अभिजीत मेंढे, अमरावती
लेखक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथे इतिहास या विषयाचे अध्यापन करतात.

Post a Comment

2 Comments

  1. Very nice writing on Indo-Afghan relation. We had deep relation in Maurya period.
    I think the Britishers are much responsible for the present Afghan condition. They never attached the Afghan territory to India and divided with the Durand Line with the fear that imperialist Russia may attack to India as it already had attack on Manchuria. They have make Afghanistan as a buffer state between two empires Russia and British.
    With this Afghanistan never could see the modern education, political awareness and Democratic process. They always have transferred the power in barbarian way. It runs even today, we can say.

    ReplyDelete

Write for The Vidarbha Gazette!